पावसाळे !

By

शहर अख्खे थिजवतो, भितीदायक खिजवतो,

कसलं चिंब-बिंब, आजकाल वरच्यावरच भिजवतो.

कुठे गेला पाऊस तो, गच्चीवर घेऊन जाणारा,

शाळेभोवती तळे साचून, शांत संथ वाहणारा.

गप्पांमध्ये रंगणार, दडपे पोह्यात रमणारा,

“आल्याचा चहा कर ना”, आजीशी हट्ट धरणारा !

कागदी होडीशी खेळणारा, हिरवे गालिचे पेरणारा,

लांब कुठे रेडिओ वरती, गीतमालेत घेरणारा .

कादंबरीत हरवणारा, झुळझुळ वारे झुलवणारा,

इंद्रधनु च्या छत्री खाली, सोनचाफा फुलवणारा !

आपल्यासोबत बहुदा आता, पाऊसही मोठा झालाय,

अनेक पावसाळे पाहून तोही, आपल्या इतकाच खोटा झालाय.

सवय झाली आहे तशी, आता आतून कोरे राहण्याची,

पाऊस असून जो कोरा आहे, काय व्यथा त्या पाण्याची !

– केतकी

Posted In ,

Leave a comment